नमस्कार!!!
सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज आपण सर्वांनी सुख समृद्धीची, भरभराटीची आणि संपूर्ण जगाला हैराण करून सोडलेल्या कोरोनापासून मुक्त होण्यासाठी आरोग्यदायी गुढी उभारली. शोभायात्रा नाहीत की शेजारच्या घरात जाऊन शुभेच्छा देणंसुद्धा नाही. परिस्थितीच तशी गंभीर झाली आहे. या जागतिक महामारीशी प्रत्येक जण आपापल्या परीने दोन हात करत आहे. पण, काही लोक कोरोनाच्या विषाणूला अजूनही गंभीरपणे घेत नाही आहेत, हे लक्षात आल्यावर आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना “lockdown 21 days” चा आदेश द्यावा लागला. जमावबंदीमध्ये लोक रस्त्यावर गरबा खेळू लागले आणि मिरवणूक काढू लागले तर सरकार अजून करणार तरी काय म्हणा!
आता मुख्य मुद्द्याला हात घालते. तर… जिवंत राहायचं असेल तर अजून कमीत कमी २१ दिवस घरी राहायचं आहे. त्यामुळे, काही जबाबदाऱ्यांचं घरातील सर्व सदस्यांनी पालन केलं पाहिजे असं मला वाटतं. जेणेकरून, घरातील एकाच माणसावर सगळा भार पडणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ही उन्हाळ्याची सुट्टी नाही. असं समजा की आपण सरकारच्या नजरकैदेत आहोत तब्बल २१ दिवस! कालच कोणीतरी एक लेख WhatsApp वर फॉरवर्ड केला होता. त्या लेखाचा सारांश असा होता की, आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये खूप जास्त व्यग्र झालेलो आहोत आणि आज जर जबरदस्ती घरी बसलो आहोत तर तोच वेळ आपण आपल्या कुटुंबाबरोबर घालवावा. किती छान विचार आहे ना? पण, माझ्या मनात याहून महत्वाचा एक विचार सतत डोकावून जातोय. तो म्हणजे घरातील गृहिणींच्या आरोग्याचा!
हो! सध्या Lockdown मुळे मोलकरीणींना सोसायटीमध्ये प्रवेश नाहीये. त्यामुळे, घरात २ माणसं असोत व १० माणसं, त्यांचं जेवण, कपडे, भांडी हे सगळंच घरातील बायकांना करावं लागतंय आणि काही बायका तर हे सगळं करून WFH सुद्धा करतायत. काही जणांकडे हे रोजचंच असेल. पण, तिथेही घरातील सगळेच सदस्य २४ तास घरी नसतात. त्यामुळे थोडं फावतं. आता तसंही नाही. जितकी घरात माणसं तितक्या त्यांच्या फर्माइशीसुद्धा २४ तास सुरूच असणार! अशा वेळी जमलं तर आपापल्या परीने घरातील स्त्रियांना कशी मदत होईल याकडेच लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण, त्या जर आजारी पडल्या तर तुम्हाला ना SWIGGY चा सहारा आहे ना ZOMATO चा.
घरातील सर्व वयोगटातील लोकांनी पुढे नोंद केलेल्या गोष्टी करायचा प्रयत्न जरी केला तरी मगाशी नमूद केलेल्या लेखाप्रमाणे बायकांनाही सतत स्वयंपाकखोलीत न राहता सर्व सदस्यांबरोबर वेळ घालवता येईल, गप्पाटप्पा मारता येतील.
घरातील जे नवरदेव ऑफिसचं काम घरून करत आहेत ज्याला आपण work from home म्हणून संबोधतो, त्यांनी घरातील स्त्रीवर्गाच्या work from home लाही तितकंच महत्व दिलं पाहिजे. इतके दिवस घरातील कोणत्याच कामात मदत केली नसेल पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता एखाद्या कामाला हात घालायला हरकत नाहीये. तेही नाही जमलं तर फक्त जाऊन “काही मदत हवी आहे का?” एवढं विचारलंत तरी तिला मानसिक आधार वाटेल. भारतात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने जगता यावं यासाठी अजून कमीत कमी १०० वर्ष तरी जातील, हे मी एका महिलेकडूनच काही दिवसांपूर्वी ऐकलं होतं. पण, त्याचा पाया कदाचित इथे कुठेतरी रचला जाऊ शकतो असं मला वाटतं.
नवीनच senior citizenship मध्ये आगमन केलेल्या घरातील वर्गाने जगातील ताज्या घडामोडी कुटुंबीयांपर्यंत पोहोचवाव्यात. फक्त ताज्या घडामोडी! WhatsApp वरचे Forwarded messages नाही. कारण, कोरोनाच्या भीतीमुळे सगळेच घाबरले आहेत. खोटे आणि विचित्र प्रकारचे message दाखवून घरात दहशत पसरवू नये.
आता येतो तो वरिष्ठ वर्ग! साधारण ७५ च्या वरचाच. तुम्ही मूग गिळून गप्प बसणे हा वाक्प्रचार ऐकला आहे का? बस्स! अक्षरश: हेच करायचं आहे. तुम्हाला बसल्या जागी खाण्यापिण्याचा सगळा पुरवठा कसा करता येईल यासाठी घरातील सशक्त पिढी २४ तास तत्पर आहेच. तुम्ही फक्त थोडी सहनशक्ती दाखवली तर सगळंच सुरळीत पार पडेल. उगीचच या भाजीत मीठ कमी कसं झालं किंवा भाजीमध्ये तेल जरा जास्तच झालं असे वायफळ मुद्दे चर्चेमध्ये आणू नयेत. घरातील सर्व सदस्यांचं मानसिक संतुलन कसं बनून राहील याकडे लक्ष दिलंत तर उत्तमच! नाही केलंत तरी मूग आहेतच आपल्याकडे.
आता प्रश्न उरतो तो घरात सतत कार्यरत असणाऱ्या बायकांचा. एकट्याच असाल तर स्वत:ची तब्येत सांभाळून सगळी कामं करा. एका वेळेची भांडी थोडा वेळ पडून राहू शकतात. घाईघाईमध्ये सगळी कामं पूर्ण करण्याचा अट्टहास नको. तसंच, एकाहून जास्त बायका असाल तर एकमेकींच्या सहकार्याने सगळी कामं वाटून घ्या. म्हणजे, एकीवरच सगळी कामं पडणार नाहीत.
एवढं सगळं कशासाठी तर बायकांच्या आरोग्यासाठी! त्या घराच्या खऱ्या आधारस्तंभ आहेत. जर त्याच कोसळल्या तर तुम्हाला या बिकट परिस्थितीमध्ये दुसरा तारणहार कोणी नाही हे कृपया लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! प्रत्येकाने स्वत:च्या घराची काळजी घ्या. मगच हळू हळू का होईना पण पूर्ण जग या महामारीतून लवकरात लवकर स्वत:ला वाचवण्यात यशस्वी ठरेल.
धन्यवाद.