काल माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला WhatsApp वर. तिला जुळे मुलगे झाल्याची बातमी कळली. ऐकून आनंद झाला. ही अशी गोड बातमी मिळाली की आनंद तर होतोच. पण माझ्या या नवीन पिढीला जन्म देणाऱ्या सखींसमोर थोडंसं मनोगतही व्यक्त करावंसं वाटतं.
खाण्यापिण्याच्या बाबतीत तर आपण बाळाचे लाड पुरवतोच. पण नवी पिढी म्हणून थोडीफार दक्षता घ्याल ना? बाळ थोडं मोठं झालं की त्याला आपण त्याच्या लिंगाची ओळख करून देतो. तेव्हा एका गोष्टीची काळजी आता घ्यायला हवी. कसली माहितीये? आपण लिंगावरून तर त्याला कामं निवडून देत नाही ना? याची!
ब्रह्मदेवाने स्त्री पुरुष बनवले असं ऐकिवात आहे. जर हेच गृहीत धरून चाललो तर त्याने स्त्रीने घरात लादी, धुणी-भांडी करावी आणि पुरुषांनी ही कामं करू नयेत असं तर ठरवलं नसेल? बरं! एका वेळेस चला हे सुद्धा गृहीत धरू. कालांतराने झालं काय, तर आर्थिक परिस्थितीमुळे महिलांनासुद्धा घराबाहेर पडावं लागलं. काम शोधावं लागलं. छोटं-मोठं का होईना. पण काम. या परिस्थितीमध्ये थोडं गणित विस्कटलं. स्त्री आता घरातलीच नाही तर बाहेरची कामंसुद्धा करून अर्थार्जन करू लागली. पुरुषांच्या आयुष्यात मात्र काहीच बदल झाला नाही.
अजून थोडा काळ सरला. आता थोडी सुशिक्षित पिढी अस्तित्वात आली. या पिढीने तर चक्क “मुलगी शिकली, प्रगती झाली” किंवा “मुलगी वाचवा मुलगी शिकवा” असे नारेच लावले. मुलगी शिकून आता नवऱ्याच्या बरोबरीने अगदी त्याच्या खांद्याला खांदा लावून खंबीर उभी राहिली. पण तरीही ब्रह्मवचन तेच. बाईने घरसुद्धा सांभाळावे आणि नोकरीसुद्धा! आणि तिने ही तारेवरची कसरत केली की तिला superwoman चा खिताब द्यायला सगळे पहिल्या ओळीत सज्ज!
आता आपण एक पुढची पिढी जन्माला घालत आहोत तेव्हा हातात हात घेऊन मनाशी एक ठरवलं तर? स्त्री-पुरुष हा भेद समजातून काढूनच टाकला तर? स्त्री-पुरुष समानतेने नांदू लागले तर?
सखी… तुला मुलगी झाली तर तू तिला घरातलं बारीक-सारीक सगळं काम शिकवशीलंच. पण, मुलगा झाला तर येणारी सून त्याची सगळी कामं करेल, त्याला हवं नको ते ती त्याला हातात आणून देईल या विचारांची तर तू नाहीस ना? एक गोष्ट लक्षात ठेव. सून म्हणून येणारी मुलगी सुद्धा तुझ्या मुलाएवढीच मेहनत करून, स्वतःचं करिअर बनवून इथवर आलेली असेल. हां! आता तुला तिला तुझ्यासारखी तारेवरची कसरत करून तीलासुद्धा “Superwoman” चा खिताब द्यायचा असेल तर माझी काहीच हरकत नाही. पण तसं नसेल तर मुलाला देखील घरातील कानाकोपरा माहिती करून दे. कुठली वस्तू कुठे आहे ते त्यालासुद्धा माहिती असणं तितकंच गरजेचं आहे.
“मुलगी शिकली, प्रगती झाली” हे नारे आता बंद करा. कारण मुली शिकून, प्रगती करून खूप पुढे निघून गेल्या आहेत. ज्या दिवशी त्यांनी घर, ऑफिस या दोन्ही गोष्टी सांभाळायची तयारी दाखवली त्याच दिवशी त्यांनी या समाजाविरुद्ध खूप मोठं युद्ध जिंकलं. आता त्यांना गरज आहे ती मदतीची. त्यांनी उभारलेला त्यांच्या करिअरचा डोलारा विस्कळीत होऊ नये म्हणून. हा मदतीचा हात त्या त्यांच्या नवऱ्याकडेच मागू शकतात. हेच पुढच्या पिढीचे नवरा-बायको आपण आज घडवतोय सखी! पुढारलेल्या विचारांचे… एकमेकांच्या बरोबरीचे! जिथे बायकोला ऑफिसमधून घरी यायला उशीर झाला तरी नवरा तिची मदत करायला सज्ज असेल. तो तिची आणि ती त्याची कामं वाटून घेतील.
समाज तिथेच आहे. त्याला या नवीन विचारांच्या लाटेबरोबर पुढे ढकलणं हे आपल्या पिढीचं कर्तव्य आहे. त्या दिवशीच कोण्या एका महान साधू बाबाचा विडिओ माझ्या निदर्शनास आला. त्यांचा चर्चेचा विषय थोडक्यात असा होता की “बायकांनी कशाला प्राधान्य द्यावं? मातृत्व की करिअर?”. म्हणजे बायका चंद्रावर जाऊन पोहोचल्या तरी ह्यांचं घोडं अजून इथेच अडलंय! हे बाबा काय म्हणतात तर म्हणे… “गरज असेल तरच बायकांनी अर्थार्जनासाठी घराबाहेर पडावं.” “गरज?” म्हणजे बायकांनी छंद म्हणून सुद्धा नोकरी करू नये? बळजबरी २४ तास मन नसताना घरची कामं करत बसावी? बायकांनी केलेलं अर्थार्जन म्हणजे “गरज”… किती सोपं करून टाकलं ना? असे हे एकच थोर नाहीत, बरेच आहेत. त्यांची विचारसरणी बद्दलण्यापेक्षा नव्याने सुरुवात करणं कधीही चांगलं हे तर तुम्हालाही एव्हाना पटलंच असेल.
या लेखाद्वारे एक खूप महत्वाचा किस्सा सांगावासा वाटतोय आज. माझी एक मैत्रीण. जिचा प्रेम-विवाह झाला. काही कारणास्तव मुलाच्या घरून विरोध होता. पण लग्न झालं. तरीही सासू-सासऱ्यांचा रोष होताच! नवऱ्याने काही महिन्यानंतर परिस्थिती समजून घेऊन बायकोला घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. तरीही सासू-सासऱ्यांचं येणं-जाणं होतंच. या मधल्या वेळेतसुद्धा तिने सासूबाइंचा इतका छळ सहन केला आहे की आजही ते सांगताना टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. नोकरी आणि घर सांभाळताना सासूने तिचे केलेले हाल ती काही केल्या विसरू शकत नाही. आज तिला २ मुलगे आहेत. सांगायचा मुद्दा असा की तिच्याबरोबर जे घडलं त्यानंतर ती आता तिच्या दोन्ही मुलांची छोट्या-मोठ्या कामात मदत घेते. तिने मुलगा मुलगी हा भेद कामामध्ये केलेला नाही. “मला माझ्या सुनेला माझ्यासारखा त्रास सहन करू द्यायचा नाही” हे त्यामागचं उद्दिष्ट! माझ्यासाठी तिने केलेला हा एक खूप क्रांतिकारी विचार आहे.
नुकताच Friendship day होऊन गेला आहे. त्याचंच औचित्य साधून मी माझ्या पिढीच्या मित्र-मैत्रिणींना जे आई बाबा झाले आहेत किंवा येणाऱ्या नजीकच्या काळात होतील, त्यांना आवाहन करते की स्त्री-पुरुष हा भेद बाजूला ठेवून स्त्री-पुरुष समानतेकडे भर देऊया. हे असं केलंत तरच तुम्ही पुढच्या पिढीसाठी COOL आई-बाबा आणि सासू-सासरे ठराल!