रामराज्य की सीताराज्य?

माझं माहेर लालबाग… त्यामुळे गेली दोन वर्षे कोरोनाच्या महासंकटामुळे गणपती सोहळा ज्या शांततेत साजरा होतोय, ते बघून मन सुन्न होऊन गेलंय. पण तरीही… एवढ्या संकटांवर मात करून तू आमच्या भेटीला आलास हेच काय कमी आहे बाप्पा! बाप्पा तू परतीच्या वाटेवर असताना असंख्य भक्तांनी तुला पुढच्या वर्षी धूमधडाक्यात येण्याचे सप्रेम आमंत्रण दिले आहे. ते मात्र विसरू नकोस हां! तू एव्हाना सुखरूप तुझ्या घरी परतला असशील याची मला खात्री आहे. बाप्पा… तू घरी निघून गेलास पण तुझ्या जाण्यानंतर इथे काय बातमी ऐकू आली माहित आहे का?

एका उपनगरात २६ जणांनी मिळून एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. टीव्हीवर सांगिलेली ही बातमी ऐकल्यावर त्यावर काय भाष्य करावे हेच कळत नव्हते. बरं भाष्य करावे की करू नये? बातमी ऐकली तेव्हा मी भांडी घासत होते बाप्पा. एका क्षणी असं वाटलं की एखादं भांडं धाडदिशी आपटावं किंवा फेकून द्यावं दूर. त्या भांड्याचा जो आवाज होईल त्याने माझ्या मनाला शांती मिळाली असती का? त्या मुलीचं काय झालं असेल… त्या गुन्हेगारांना पकडलं असेल का? पकडलं तरी त्यांना किती मोठी शिक्षा होईल? शिक्षा होईल हे खरं पण इतक्या अक्षम्य कृत्याला मरणाची शिक्षा पण पुरेशी नाहीच ना… मग?

बाप्पा मला एक सांग… अशा अक्षम्य कृत्यासाठी समाजाने एक अर्थपूर्ण, परिपूर्ण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निरपेक्ष कायदा बनवला तर? आणि हा कायदा इतका कठोर असावा की कुठल्याही पुरुषाने बलात्कार तर दूरच पण स्त्रीकडे नजर वर करूनसुद्धा बघू नये. समाज, आपले ज्येष्ठ राज्यकर्ते आणि आपली न्यायव्यवस्था नेमक्या कुठल्या मुहूर्ताची वाट पाहेत बाप्पा? तूच का नाही त्यांना मदत करत असा कायदा बनण्यासाठी मुहूर्त काढायला? आजच घरी देवी आई पण विराजमान झाल्या आहेत. त्यांनाही येण्यापूर्वीच या सगळ्या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली होतीच. रात्रीची आरती झाल्यावर देवी आई मला सांगत होती, “तुम्ही मनोभावे आमची पूजा केलीत… आम्ही प्रसन्न झालो आहोत. पण समाजातील एक वर्ग पूर्णपणे भटकलेला आहे. काही लोक आम्हाला देव्हाऱ्यात बसवून आमची पूजा करतात आणि आमचंच रुप असलेल्या स्त्रियांवर हे असे अत्याचार? अरे मूर्खांनो… प्रत्येक स्त्री हे माझंच रूप आहे. स्त्रीशक्ती हीच आदिशक्ती आहे. माझी पूजा म्हणजे प्रत्येक स्त्रीची, तिच्या अस्तित्वाची पूजा करण्यासारखं आहे.” बाप्पा देवी आईचे हे शब्द ऐकून मी झोपून तर गेले पण मनात असंख्य विचारांचं तांडव सुरू होतं.

ब्रम्हदेवाने सृष्टी बनवली तेव्हा कोणालाच उच्च नीच असा दर्जा दिला नाही. पण माणसाने तेही करून दाखवलं बाप्पा. अगदी जातीपासून लिंगापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये भेदभाव. इतका भेदभाव की लोक आता त्याच्या आधारावर जीवही घेतात एकमेकांचे. एका जातीला उच्च म्हटलं आहे तर दुसऱ्या जातीला नीच. तसंच पुरुषांनी देखील स्त्रियांना स्वतःचं गुलाम तर नाही बनवलंय ना बाप्पा? सुरुवातीपासूनच स्त्रियांची प्रतारणाच होत आली आहे. ती पोटात असली तरीही तिला मारून टाकतात. चुकून तिने जन्म घेतलाच तरी तिच्या बोलण्यापासून ते वागणुकीपर्यंत आणि पेहेरावापासून खाण्याच्या सवयींपर्यंत प्रत्येक गोष्टीचं भांडवल केलं जातंय. बाप्पा… हुंडाबळी, बलात्कार, लैंगिक शोषण या आणि अशा बऱ्याच संकटांना तोंड देत देत आता तिची शारीरिक आणि मानसिक झीज झालीय. तुला जमलंच ना तर ब्रह्मदेवाला माझा एक निरोप दे देवा… देवांना सांग की त्यांनी घडवलेल्या ‘स्त्री’ या अतिशय सुंदर आणि सामर्थ्यशाली आविष्काराची पृथ्वीतलावर अजिबात कदर केली गेलेली नाही. त्यामुळे समाजाची बायकांना जन्म देण्याची मुळात लायकीच नाही. त्यामुळेच बंदच करून टाक स्त्री आणि तिच्या असंख्य स्वप्नांचं जन्माला येणं. जर वाटलंच तुला त्या जगाव्यात… तर माझी तुला एकच प्रार्थना देवा… आता तरी सीताराज्य येऊ दे देवा… आता तरी सीताराज्य येऊ दे!